Thursday, June 6, 2013

नशा



जसे जसे वय वाढत आहे तसे मी जास्त शांत अबोल होत आहे. स्वतःशीच खूप वेळ बोलत राहतोय एकांत खूप आवडत आहे. रोज रात्री उशिरापर्यंत जागेच राहायचे. रोज कोणता ना कोणता विचार मनाला छळत राहतो. मित्रांजवळ काही बोलावे तर पूर्वीचे असे कटू अनुभव आहेत कि आता मित्रांपासून पण दूर राहणेच पसंद करतो. मित्र म्हणजे काही काळाचा सोबती कधी विचार जुळत नसले तरी काळाची गरज म्हणून जुळवून घेतले जातात. आपल्या मनातील भावना कुणा समोर बोलून दाखवताना खूप विचार करावा लागतो. नाहीतर तुमच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात किंवा तुमची हरघडी चेष्टा केली जाते.

रात्री झोप लागत नाही म्हणून पुस्तक वाचत राहतो, एखादे पुस्तक आवडले तर पुन्हा पुन्हा वाचत राहतो. कधी कधी तर त्याचा पण खूप कंटाळा येतो मग असेच कॉलेजच्या आवारात फिरत राहतो. प्रेम म्हणजे काय? या गोष्टीची आता कोठे ओळख झाली आहे. आतापर्यंत खूप वेळा प्रेम झाले असा भास झाला होता. पण हे प्रेम जरा वेगळेच आहे. तिची हर एक गोष्ट झोपू देत नाही. तिच्यासाठीच जगायचे एवढेच माहित आहे. ती माझी आहे आता पण नक्कीच आज न उद्या सोडून जाणार आहे. उद्या मला ती सोडून जाणार आहे म्हणून आज तिच्या बरोबरचा दिवस का निरस घालवू? प्रेमामध्ये इतका त्रास असतो हे माहित नव्हते पण ह्या त्रास मध्ये पण काही औरच नशा आहे.  प्रेम प्रेम काय ते हेच का ? का मला निद्रानाश झाला आहे ? कळतच नाही. आता पण काय लिहतोय हेच समजत नाही जे सुचत जातेय ते लिहलले जातेय बस.

एका रात्री असेच नेहमी सारखी झोपच लागत नव्हती. काही वाचन करायचे पण मन होत नव्हते. कॉलेजच्या आवारात फिरताना अचानक समुद्रकिनारी जाण्याचा मोह झाला. ह्या कॉलेजचे समुद्रकिनाऱ्याचे स्थान मला फार आवडते. समुद्रकिनारी बसण्यास आवडते म्हणून रात्री-अपरात्री जाणे म्हणजे जरा धोक्याचेच होते. मुळात धोक्याचा विचार कोण करतो ज्याला मरणाची भीती वाटते. मरणाची भीती तरी का घ्यायची. मरण तर एक सत्य आहे पण ते कटू म्हणून त्याचा पासून दूर पळायचे का? पळून पळून किती दूर  किती वेळ पळणार? आयुष्य म्हणजे झाडावरचे पान ते गळून पडले काय किंवा कुणी तोडले काय काय फरक पडतो? असे काहीतरी विचित्र विचार करत मी समुद्र किनारी चाललो होतो. एका ठिकाणी अंधारात काही तरी जळत असल्याचे दिसत होते. मी थोडे पुढे जाऊन पाहिले तर ३-४ मुलांचा ग्रुप पांढऱ्या पावडरची नशा करत होते.  ह्या कॉलेज मध्ये खूप मोठ-मोठ्या बापांची पोरे शिकतात इथे नशा चालते हे फक्त ऐकले होते आज प्रत्यक्ष पाहत होतो. का करतात हे नशा? स्वतःच्या शरीराची वाट लावून कोणते सुख मिळत असेन? का नशा केल्याने हे जग विसरून जात असतील? पण हे विसरणे काही क्षणाचे तर असते न? नशा उतरली कि पुन्हा आहेच ना तेच जीवन त्याच अडचणी. हे सर्व पाहून एक कविता सुचली. ती कविता माझ्या मनाची अवस्था सांगतेय का का ह्या मुलांची मलाच कळत नव्हते. 


रात्रीचा गडद काळोख खूपच भयाण वाटतोय
निराशेने मनाला कधीच वेढेलंय
मनातील आशेचे झाडच वटलंय

रात्रीच्या चंद्राकडे पाहत
उगवत्या सूर्याची वाट पाहतोय
फक्त क्षणिक सुखासाठी

कारण मावळतीचा सुर्य घेऊन येतोय
पुन्हा त्या भयाण काळोखाला
मला संपवून टाकायला
मला संपवून टाकायला

--विजय

एक नवकवी ला आपली हर एक नवीन कविता मनाला एक आनंद देत असते पण आजची हि कविता मनाला जास्त बैचैन करत आहे. ही आजची तरुण पिढी ह्या विळख्यातून कशी बाहेर पडेन. आज पुणे शहरामध्ये अनिल अवचट आपले संपूर्ण आयुष्य हे अश्या लोकांसाठी खर्ची करत आहेत. एकदा त्यांच्या मुक्तांगण ला भेट दिली होती. अजून तो दिवस आठवतो त्यांचे ते कार्य मन भारावून टाकणारे होते.  माझी सर्व मित्रांना एक विनंती आहे जर तुमच्या आसपास कोणी असा नशेत गुंतलेला तरुण असेन त्याला  मुक्तांगणची वाट जरूर दाखवा.

2 comments: