Tuesday, June 4, 2013

माझे पहिले वेश्यागमन


[ या प्रसंगातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत .]


अभियांत्रिकीचे शेवटचे वर्ष होते. तीन वर्ष कॉलेज होस्टेलमध्ये राहून कंटाळा आला होता म्हणून आमच्या ग्रुपने बाहेर रूम करून राहण्याचे ठरविले. कॉलेजच्या आवारातच जवळ एक १BHK  फ्ल्याट भाड्याने घेतला. बाहेर रूम वर राहण्यास आल्या पासून थोडी मोकळीक आणि स्वतंत्र मिळू लागले. सुरवातीचे दिवस खूप छान गेले.

हळू हळू रूमवर खूप वेग वेगळ्या गोष्टी घडू लागल्या. प्रत्येकी भाडे कमी पडावे म्हणून आम्ही ६-७ जण राहत होतो. प्रत्येकाचा स्वभाव हा निराळा असतो. काही दिवसाने रूमवर रोज कोणी ना कोण आपल्या गर्लफ्रेंड घेऊन येऊ लागले. कोण कुणाचा मित्र असे. त्या मुली पण अगदी बिनधास्त रूमवर वावरत असे. कधी कधी न्यूज पेपर मध्ये बातमी येते प्रियकराने लग्नाला नकार दिला म्हणून एका तरुणीची आत्महत्या तेव्हा अशा विचार येतो आत्महत्या करणारी मुलगी पण अशीच रूमवर बिनधास्त वावरली असेन ना. मुलींचीच चूक आहे असे नाही जास्त चूक तर मुलांची असते. मुली भावनिक असतात पण मुलांना मुलींच्या मनाशी कसे खेळायचे, त्यांना रूम पर्यंत घेऊन येई पर्यंत कसे प्रेमाचे जाळे फेकायचे हे चांगले ठाऊक असते. एकदा मन भरले कि मुलीला अलगद दूर केले जाते. हे सर्व मी आता जरी बोलत असलो तरी मी देखील असाच सामान्य होतो. हे सर्व पाहून मनात खूप विचार येत होते,  आपण देखील मुलगी पटवावी (हो आता हाच शब्द वापरला जातो प्रेम झाले किंवा केले असे नाहीच सुडौल बांद्याची मुलगी दिसली कि कशी पटवायची एवढेच, मुली पण मूर्ख असतात दिखावूपणाला लगेच पटतात.) पण आम्हाला देवाने रूपच असे दिले आहे कि आम्हाला कोणी वळून पाहिले तर त्या मुलीची तिच्या मैत्रिणीच चेष्टा करतील. गोड गोड बोलून कुणाला फसवावे तर साधे सरळ बोलताच येत नाही. एखाद्या अनोळखी माणसाला एका ऐकण्यात जर आमचे बोलणे समजले तर खरच त्याच्या कानाला देवाने वेगळीच देणगी दिली असेच म्हणावे लागेन. अशी आमची अवस्था म्हणून मनातील विचार मनातच राहत असे आणि मित्रांनी सांगितलेले त्यांचे अनुभव फक्त चवीने ऐकायचे अन फार झाले तर मनात कल्पना करायची.

एका शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो. मुलांच्या रूमवर सेक्स, मुलगी आणि खेळ (इथे खेळ म्हणजे क्रिकेट) हेच विषय चवीने चगळले जातात. आम्ही पण त्याला काही अपवाद नव्हतो. आज आमचा विषय होता वेश्या कॉल गर्ल. आमच्या रूपाचे वर्णन केल्याप्रमाणे आम्हाला दुसरा पर्याय पण नव्हता. एक मित्र त्याच्या वेश्यागमनचे एक एक अनुभव रंगवून सांगत होता. माझे कानशिले गरम होत होती, अंगातून वेगळीच लहर दौडत होती. अंगावर काटा येत होता. आपण कोणत्या तरी मोठ्या सुखापासून वंचित आहोत अशी हूर हूर वाटत होती. आपण देखील धाडस करून हे सुख अनुभवले पाहिजे. मी माझ्या मनातील विचार त्या मित्राला सांगितले, बस तो लगेच तयार झाला. मी आणि माझे २ मित्र आमचे ठरले उद्या सकाळ सकाळ पुणे ला निघायचे. कराड पासून पुणे ३ तास प्रवासाच्या अंतरावर. दुपारपासून संध्याकाळपर्यंत खरेदी, रात्री रेड लाईट भागात आणि पहाटे कराड ला माघारी असा कार्यक्रम ठरवून आम्ही झोपलो. मला तर झोपच लागत नव्हती उद्याचे नवनवीन स्वप्न दिसत होते. उद्या आपण एका नवीन गोष्टीचा अनुभव घेणार आहोत या विचारानेच झोप उडाली होती.

काल रात्री ठरवल्या प्रमाणे आम्ही पुणे मध्ये आलो. सुर्य मावळला होता थोडा अंधार पडला होता. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन जवळच्या रेड लाईट भागात शिरलो. देवाला मी कधी न मानणारा पण आज माझे हात कसे जोडले गेले मलाच कळले नाही. काल रात्री वाटणारी उत्सुकता हूर हूर आता भीतीमध्ये बदली होती. प्रत्येक दिसणारी व्यक्ती गावाकडची ओळखीची वाटत होती. मला वाटणारी काळजी मित्राने ओळखली त्याने धीर दिला "मर्द बन साले". त्या भागातून फिरताना एक एक मुली कडे पाहत होतो. एका मुलीकडे लक्ष गेले मित्राने ते हेरले होते. "काय लेका आवडली दिसतेय विचारू का?" मी मानेनेच होकार दर्शवला. मित्राने जाऊन सर्व काही ठरवले. मी त्या मुली पाठोपाठ त्या अंधाऱ्या जिन्यात वर गेलो. प्रकाश अंधुक अंधुक होता. एकच मोठ्या रूममध्ये पार्टिशन करून छोट्या छोट्या रूम्स बनवल्या होत्या. मी त्या मुली बरोबर एका रूम मध्ये गेलो. तिने विचारले "फस्ट टाईम बैठ रहा है लगता  है ?" मला तिला काय उत्तर द्यावे कळतच नव्हते मी फक्त शांत बसून होतो. त्या मुलीच्या मनात काय आले कुणास ठाऊक ती बोलली  "मेरे से तुझे कूछ नही होगा तेरे लिये नया माल लाती हु " एवढे बोलून ती निघून गेली.

रूम मध्ये एकटाच होतो ती भयाण शांतता, सिगरेटचा उग्र वास, तो मंद प्रकाश सगळे जीव घेणे होते. असा वातावरणामध्ये कोण कुणाची प्रेमाची भूख माफ करा शरीराची भूख कशी भागवत असेन? जे स्वप्नामध्ये पाहिले होते आणि इथे वास्तव्यात काही वेगळेच चित्र दिसत होते. मी माझ्या विचारात हरवून गेलो होतो मनात पेटलेली वासना कधीच शमली होती. आतापर्यंत जे पाहिले ते थोडे म्हणून अजून एकाची भर पडली. माझ्या समोर उभी होती ती १६-१७ वर्षाची मुलगी. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. निरस भावशून्य चेहऱ्याने ती उभी होती. तिच्या मनातील भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती जवळ येऊन बसली होती पण माझी तिच्याकडे पाहण्याची हिंमत देखिल होत नव्हती. मी तिला विचारले नाव तुझे. "मी पूनम".मला माहित होते हे तिचे खोटेच नाव असणार. मी थोडे धाडस करून विचारले तू इथे कशी? ती बोलली "तुमच्या कामाशी काम ठेवा कशाला हवी तुम्हाला नुसती चौकशी. आले माझ्या नशिबी हे जीणे ते जगते आहे. आई वडील लहानपणीच गेले गाव दुष्काळातले घरात खाणारी खूप तोंडे होती म्हणून नातेवाईकांनी विकले मला इथे काही पैसासाठी. आता झाले तुझे समाधान आता काढ कपडे मला वेळ नाही". तिने रागाच्या भरात मनातील सगळे काही सांगून टाकले होते. मला काहीच करायची इच्छा तर राहिली नव्हतीच पण स्वतः बद्दल खूप राग चीड येत होती. मी तिच्याकडे न पाहता बाहेर निघून आलो.

मी म्हणालो तिला: तू इथे कशी ? 
ती बोलून गेली : 
पैशासाठी बापाने सोडलेली पोर 
मी इथेच तर असणार ना ?
 या नरकयातना भोगायला 
रोज थोडे थोडे मरायला 
तुमच्या शरीराची भूक भागवायला 
मी इथेच तर असणार ना?

बायकोचे माझ्यापेक्षा संसारातच
फार मन
असे म्हणून येता तुम्ही कोठ्यावर
 पण सांगते मी तुम्हाला
शरीराच्या मिलनापेक्षा मनोमिलन
फार मोलाचे
जोवर आहे शरीराची भूख
तोवर माझी सुटका नाही

वाटते मला ही यावे
या तुमच्या उच्चभ्रू समाजात
जगावे थोडे ताठ मानेने
 उराशी असंख्य स्वप्न घेऊन
म्हणून विनवते मी तुम्हाला
सोडा हा माझा नाद
अन येऊ द्या मला
आपल्या माणसात
येऊ द्या मला
आपल्या माणसात

-- विजय

आपण वेश्याबद्दल जे विचार करतो खरच ते योग्य आहेत का? तिथे येण्याऱ्या मुली कोणत्या मार्गाने येतात? कुणाबरोबर ही झोपताना त्यांना किती वेदना होत असतील? प्रत्येकाने विचार केला तर कळून जाईल प्रत्येकजण कसा न कसा ह्या गोष्टीला जबाबदार आहे. अजून ही मुलींकडे एक उपोभोगाची वस्तू म्हणूनच पाहिले जाते. शरीराची भूख वासना ही अमर्याद असते ती कधी ही पूर्ण होत नाही त्याला एकच पर्याय आहे संयम. प्रणय ह्या गोष्टीला समजून घ्यायची गरज आहे. आपल्या प्रेमातील प्रणय हा अगदी छोटाशा भाग आहे. आपल्या साथीदारावरचा विश्वास व्यक्त करण्याची क्रिया आहे. वासनेतून झालेला प्रणय फक्त त्रास आणि त्रासच देतो तो आगीप्रमाणे भडकतच राहतो.

प्रेम प्रेम म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घ्याची गरज आली आहे असेच वाटतेय. आज कोणी जर बोलले हि माझी प्रियसी आहे तर लगेच मित्रांचे वाक्य असते काय लेका काही केले आहे कि नाही आरे कमीत कमी कीस तरी घ्यायचं यार. प्रेम हे इतकेच आहे का? शरीराची ओढ ही एक प्रेमातील छोटीशी गोष्ट आहे पण आजकाल केले प्रेम केले जाते ते फक्त शरीराच्या ओढीनेच. आणि ती प्रत्येक वेळी ती बदलत असते.भावनिक प्रेम हे शिल्लक आहे का कोठे आता? वासना ही अमर्याद आहे.

प्रीती म्हणजे यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे.  वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेली वर करुणा उमलते, मैत्री फुलते.  -वि. स. खांडेकर

 कुणाचा वेश्या म्हणून स्वीकार करणे सोपे पण कुणाचा बहीण म्हणून सांभाळ करणे फार कठीण. 



 

2 comments: