Wednesday, May 22, 2013

निशब्द (तिच्या डायरीतील एक पान)




जानेवारी २०१३ चा दिवस होता. एक महिन्याच्या सुट्टीनंतर कॉलेजला जाणे खरेतर माझ्या जीवावरच येत होते. त्या कडाक्याच्या थंडीत मी अंगात स्वेटर घालून  फलटण बस स्टाव्पवर पंढपूर -नाशिक बसची वाट पाहत बसली होती. भारतीय वेळेप्रमाणे कधी कोणती बस वेळेवर येतेच कोठे ? पण मंचरला डायरेक्ट बसनेच जायचे ही घरातून आईची कडक सूचना त्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात ही थंडी काही केल्या अंगातून निघत नव्हती. नवीन लग्न झालेल्या जोड्प्यांशिवाय मला नाही वाटत कुणाला ही थंडी गुलाबीथंडी वाटत असेन.  
थोड्यावेळातच बस आली. मी खिडकीजवळच्या सीटवर बसले, सुरुवातीला बसमध्ये गर्दी कमी होती पण आता गर्दी वाढू लागली होती. त्या गर्दीकडे पाहून मैत्रिणींनी त्यांच्या प्रवासातील सांगितलेल्या एक-एक कटू आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. अशा गर्दीचाच फायदा घेऊन काही वात्रट मुले मुलींची छेड काढतात.त्यांचे ते किळसवाणे स्पर्श,त्रासदायक धक्के मारणे, एखाद्या पिसालेल्या कुत्र्याप्रमाणे लाळ चाटत वासनेने बरबटलेल्या नजरेने पाहणे असे नाना प्रकार ऐकले होते. कधी कधी वाटते ही मुले अशी का वागतात ? त्यांना कोणता आनंद मिळतो ते देवच जाणे. कोणत्याही मुलीला त्रास देताना आपल्या बहिणीला ही कोणी अशाच त्रास देत असेन. ती कशी या सर्वाना तोंड देत असेन? कुणी त्रास देताना पाहिले तर हीच मुले त्याचा जीव घ्यायला कमी करतील का ? मग हे का विसरून जातात आपण ज्या मुलींना त्रास देतो त्या पण कुणाच्या बहिणी असू शकतात. घरात आई आपल्या मुलीला तू लवकर घरी ये हे घाल हे घालू नको असे उपदेश देते पण तीच आई मुलाला बाहेर दुसऱ्या मुलींना थोडा आदर देत जा असा उपदेश का देत नाहीत? काही बापांचे वाक्य तर खूपच त्रासदायक असतात तो मुलगा आहे त्याने केले तर चालते पण तू मुलगी  आहेस घराण्याच्या इज्जत मातीत घालू नकोस. किती दिवस मुलींनी असे निशब्द राहून हा त्रास सहन करायचा. मी मात्र याबाबतीत स्वतःला खूप नशीबवान मानते, कधी अश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले नाही आणि देवाला विनवणी करते कधी येऊ पण नाही अशा प्रसंग.
मी माझ्या विचारात इतके हरवून गेले होती कि नीरा गाव कधी आले समजलेच नाही. मुळात मी भानावर आली ते म्हणजे नीरेतील अस्वछेतेच्या दुर्गंधीने आणि फेरीवाल्यांच्या आवाजाने.माझ्या शेजारी बसलेली इसम उतरली होती. मी माझी bag मांडीवरून बाजूला ठेवली आणि थोडे अंग मोकळे करत होती इतक्यात एक मुलगा साधारण माझ्याच वयाचा असेन,उंचापुरा दिसायला देखणा बसमध्ये चढला. बसमध्ये दुसरीकडे जागा नसल्याने मी माझी bag पुन्हा मांडीवर घेऊन त्याला जागा दिली. बस सुरु झाली तसे त्याचे माझ्याकडे पाहणे सुरु झाले.त्याच्या पाहण्याने मला संकोचल्या सारखे वाटू लागले.  अगोदर फक्त पाहणारा हा महाभाग आता काही विचित्र हातवारे करत होता. माझ्या मनात थोडी भीती वाटू लागली होती. शेवटी राहून मी तिरस्कारी नजरेने पाहून विचारले ''तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का?" तो काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे फक्त ओठच हलत होते तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता. त्याने मग खिशातून पेन काढून स्वतःच्या हातावर लिहिले "ताई खिडकी बंद करते का हवा खूप थंड आहे " ते पाहून मन अगदी सुन्न झाले. एकदा मनात वाईट विचार सुरु झाले कि  सगळेच वाईट दिसू लागते या गोष्टीचा प्रथमच मी आज अनुभव घेतला. तो जे हातवारे करत होता ती मुक्या मुलांची sing language होती.तो एक मुका अबोल मुलगा होता.
आता तो त्याच्या विचारात गुंतला होता पण मी मात्र त्याच्याकडे पाहत होती. मला त्याच्याबद्दल सहानभूती आपुलकी वाटत होतीहा बोलू शकत नाही, त्यामुळे किती त्रास सहन करत असेन मनातील भावना कश्या व्यक्त करत असेन? त्याची नजर पुन्हा माझ्याकडे वळली माझ्या डोळ्यात त्याच्यासाठी  जी दयेची सहानभूतीची भावना होती ती त्याला कशी समजली हे मला एक आश्चर्यच होते. त्याने थोड्यावेळ काही विचार केला आणि डायरीतील एक पान काढून त्यावर काही लिहू लागला. मी मात्र उत्सुकतेने फक्त त्याच्याकडे पाहत होते. शिवाजीनगरला त्याने तो कागद माझ्या हाता वर ठेवून निघून गेला. मी थोडी विचारात पडले ह्याने असे का केले ? मी तू कागद उघडून पाहिला. त्याने लिहिलेली एक एक ओळ माझ्या काळजाचा ठेका चुकवत होती. इतके सुरेख अक्षर मी प्रथमच पाहत होते. त्याने लिहिलेल्या ओळी पुन्हा पुन्हा वाचत होते. डोळ्यातील पाणी त्या कागदावर पडत होते. कविता हे असे एक माध्यम ज्यातून आपण कमी शब्दात आपल्या भावना मांडू शकतो हे मला त्या दिवशी उमगले. त्याने त्या कागदावर एक कविता लिहून त्याच्या मनातील ह्या जगाबद्दलच्या भावना मांडल्या होत्या.
ती कविता ही  अशी होती:
"लाज वाटते मला तुमच्या
अश्या जगण्याची
बोलतात तुमच्या जिव्हा
पण मने मात्र रिकामीच
खेळता मनाशी दुसऱ्यांच्या
तेही शब्दांचे जाळे टाकूनच
अर्थासाठी निर्माण झालेले शब्दच
अर्थशून्य केलेत तुम्ही
लाज वाटते मला तुमच्या
अश्या जगण्याची

वाटते कधी कधी
छाटून टाकाव्यात साऱ्या जिव्हा
अन करावे हे जग निशब्द
अबोल माझ्यासारखं
बोलेल मग हे जग मनातून
कळेल त्यांना महत्त्व शब्दांचे
मनातील भाव त्यांच्या
उमटतील डोळ्यातून माझ्यासारखं
वाटते कधी कधी
करावे हे जग निशब्द अबोल "
-    विजय 
खरच आपण किती बेफिकीरपणे शब्दांचा वापर करत असतो. पूर्वीच्या काळी दिलेला शब्दच वचनपत्र मानले जात असे आज मात्र प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले तरी कोणी विश्वास ठेऊ शकत नाही. आपल्या शब्दांनी कुणाचे मन दुखावले जात असेल या गोष्टीचा  आपण थोडा ही विचार करत नाही. थोड्यात एक उदाहरण द्याचे झाले तर, ज्या आईला आपण लहान असताना आपल्या रडण्याच्या आवाजावरून आपलेल्या भूक लागली आहे का झोप ते अचूकपणे कळत असे. त्याच आईला आपण मोठे झालो कि कठीण शब्दांचा मारा करतो "तू गप्प बस आई , तुला ना काही कळतच नाही माझे मी पाहतो तू शांत राहा "  हे ऐकताना त्या माऊलीला किती वेदना होत असतील ना ? ते एक आई झाल्यावरच समजते. आजचे हे शिक्षण पदवी बरोबर मुलांना घमेंड हा दुर्गुण देते. मुलांना वाटते मी शिकलो म्हणजे मलाच सगळे समजते. आता खरी गरज आहे शैक्षणिक मूल्ये जोपासण्याची आणि सामाजिक बांधिलकी रुजवण्याची. कोणताही मुलगा बसमध्ये चढतो तेव्हा महिला सीटकडे पाहतो कोणी सुंदर मुलगी बसली आहे का पण त्याच्या हे कधी लक्षात पण येत नसेन आपण ज्या सीट वर बसलो आहे ती अपंगांसाठी राखीव आहे. बसमध्ये अपंग नसेन पण एकदा वृद्ध असेन त्याला ती सीट द्यावे असे त्याला का वाटत नाही? हे असेच सुरु राहिले तर हे संपूर्ण जग निशब्द होण्यास फार काळ लागणार नाही. प्रत्येकाने स्वतःमध्ये बद्दल केला पाहिजे कारण हृदयपरिवर्तनच समाजपरिवर्तन करू शकते.


-विजय

9 comments: