Wednesday, May 29, 2013

गरिबी एक शाप


पारू आणि शंकर यांचा संसार म्हणजे गावाच्या वेशीवर छोटीशी झोपडी, त्यामध्ये गरजेपुरते थोडीशी भांडीकुंडी.  भातुकलीच्या खेळातील संसारापेक्षाही छोटाशा संसार. शंकर गावच्या पाटलाच्या शेतावर दरसाल १५ हजार रुपयांवर सालगडी म्हणून कामाला. पारू गावातील इतर बायकांबरोबर शेतमजुरीला जाऊन घराला थोडाफार हातभार लावत होती. नऊ-दहा वर्ष उपवास- तापास नवस केल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर कृष्णा हे नाजूक उमलेले फुल.

त्या दोघांच्या निरस संसारात कृष्णाच्या रूपाने नवचैतन्य फुलले. श्रीमंतांच्या मुलांसारखे ते कृष्णाचे हट्ट पुरवू शकत नव्हते पण जे जमले तेवढे ते देण्याचा प्रयत्न मात्र करत होते. कृष्णाला खूप शिकवायचे जीवाचे रान करून त्याला शिक्षण द्याचे. आपल्या वाट्याला जे जीवन आले ते कृष्णाच्या वाट्याला येऊ द्याचे नाही. शिक्षण हाच एक पर्याय आहे या गरिबीत माखलेल्या संसारातून उभारी घेण्याचा. असे खूप खूप स्वप्न शंकर उराशी बाळगून कृष्णाचे लाड पुरवत होता.

पावसाळ्याचे दिवस होते. शंकरला शेतावर काम मिळत नव्हते. घरात खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. पारूला आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ती कृष्णाला घेऊन शेतमजुरीला येत होती. ऊसाच्या शेतामध्ये बांधाच्याकडेला साडीची झोळ करून कृष्णाला झोपवून ती कामावर जात होती. कधी-कधी कृष्णाची भूखेने झोपमोड होई. तो झोळीतच टाहो फोडत राही पण पारू मात्र मालकाच्या भीतीने खाली मान घालून काम करत. गरिबाला आपल्या भावना अश्याच मनात धगधगत ठेवाव्या लागतात . 

एक दिवस संध्याकाळी आकाशात काळ्या ढगांची गर्दी वाढू लागली. पारूच्या मनाला काळजीने वेढले होते. आकाशात ढगांचा गडगडाट , वीजेचा थैमान सुरु झाले. सुसाट्याचा वारा सुटला होता. सरी मागून सरी कोसळू लागल्या जणू आभाळाला भलेमोठे भगदाड पडले आहे. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे कुठे झाडाखाली निवारा घेणे पण सोयीचे नव्हते. पारू कृष्णाला पदराखाली घेऊन घराकडे झप झप चालली होती. घरी पोहोचताच पारुने कृष्णाला अंथरुणावर झोपवले. इवलेसे ते नाजूक गोंडस बाळ थंडीने थड-थड उडत होते. तिने त्याचे ओले कपडे बदलले, चूल पेटवून निखारा पाडला तो तव्यावर घेऊन कृष्णाला ऊब देऊ लागली. त्याला उचलून आपल्या छातीला लावले पण तरी कृष्णा तोंड उघडत नव्हता. कृष्णाची ही अवस्था पाहून शंकर गांगरून गेला होता. त्याने रागाच्या भरात पारूच्या कंबरठ्यामध्ये दोन लाथा मारून तिला शिव्या हासडू लागला. "भवाने आग लावायची हुतीस न त्या मालकाच्या कामाला , माझ्या किसनाला काय झाले तर? "    

पारू रात्रभर कृष्णाला मांडीवर घेऊन जागरण करत राहिली.  कृष्णाच्या अंगात ताप चढत होता. सकाळी उठल्या उठल्या शंकर पाटलाच्या वाड्यावर पैसे मागण्यास गेला. पण बायकोच्या बाळंतपणाला तर घेऊन गेलास कि रे भाड्या. हे वाक्य ऐकून घराकडे परतला. बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र त्यामधील चार सोन्याचे मणी सावकाराकडे गहाण ठेऊन तीन हजार रुपयांची सोय केली. ते कृष्णाला घेऊन तालुक्याच्या गावाला आले. हॉस्पिटलमध्ये कृष्णाला जनरल वार्ड मध्ये अडमिट केले. डॉक्टरांनी तपासणी सुरु केली तेवढ्यात एक नर्स घाईत येऊन तिने डॉक्टरांच्या कानात काही कुजबुज केली. डॉक्टर घाई घाई ने निघून गेली. नर्स ने डॉक्टर ने दिलेले इंजेक्शन कृष्णा ला दिले आणि ती देखील डॉक्टर पाठोपाट निघून गेली.

आमदाराच्या मुलाच्या गाडीला अपघात झाला होता. मुलगा पूर्ण दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत असताना हा अपघात झाला होता. सर्व डॉक्टर्स त्या कामात गुंतलेले होते. इकडे शंकर आणि पारुचा जीव वर खाली होत होता. कृष्णाचा ताप काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नव्हता. तीन-चार तास वाट पाहून देखील कोण येत नाही हे पाहून शंकर चौकशी करायला गेला. तिथे त्याने एका शिकवू डॉक्टरला बोलून आणले पण तोपर्यंत या कोवळ्या जीवाची जीवन ज्योत कधीच मावळली होती. दवाखान्यात ६०० रुपये बिल भरून ते दोघे तो नाजून देह घेऊन हताश बाहेर पडले. पारूच्या दुखाला अंत नव्हता. पण समजुतीचे दोन शब्द सांगणारे कोणी जवळ नव्हते. जगण्याची जी एक आशा तीच आता राहिली नव्हती. त्यांच्या अंधारमय जीवनात अनामिक पेटलेली ज्योत गरिबीच्या झुळुकेने विझून गेली होती. आता उरला होता फक्त अंधार.

 कृष्णाच्या मरणाला जबाबदार कोण नियंती का त्याच्या घरची गरिबी? आज आपण बोलतो हे प्रगतीचे युग आहे. झपाट्याने शहरे वाढत चालली आहेत पण खेडे अजूनही हि तशीच परावलंबी. मोठे मोठे हॉस्पिटल कॉलेज हे फक्त शहरांच्याच जवळ बनतात. अजून शेतकऱ्याला शेतीला पाणी द्याला ८ तासापेक्षा जास्त वीज मिळत नाही. ही खेडे स्वयंपूर्ण कधी होणार? गरिबी ही अशीच शाप म्हणून राहणार का? सरकार चालते ते फक्त उच्च मध्यमवर्गीयांसाठी आणि श्रीमंतासाठी पण गरीब कष्टकरी सामान्य कामगाराकडे कोण लक्ष देते. त्याच्या खूप काही मागण्या नाहीत फक्त अन्न ,निवारा आणि आरोग्य एवढ्याश्या मागण्या आहेत. प्राथमिक गरजांसाठीच त्याची धावपळ सुरु असते. 
 

-विजय

3 comments: