Friday, May 31, 2013

तिच्या आठवणीमध्ये


नाती-गोती ही अशीच असणार
प्रत्येक नात्यामध्ये कुणाचा न कुणाचा मतलब असणार
मनाला त्यांच्या कीड संशयाची असणार
जिकडे पाहावे तिकडे फक्त व्यभिचारच दिसणार
खऱ्या प्रेमाचे फूल मनात कधी उमलणार ?
तिच्या माझ्या प्रेमाला ते कसे समजून घेणार …।


................................................................................................................................................................ 


ती म्हणाली मला :
नको करू इतके प्रेम माझ्यावर
होईल त्रास खूप तुलाच
मला सोडून जाताना ….
मी म्हणालो तिला :
मला भीती नाही त्रासाची
पण भीती फार वाटते तुझ्या रागाची
आणि तुझ्या सोडून जाण्याच्या भाषेची


           -विजय

Wednesday, May 29, 2013

गरिबी एक शाप


पारू आणि शंकर यांचा संसार म्हणजे गावाच्या वेशीवर छोटीशी झोपडी, त्यामध्ये गरजेपुरते थोडीशी भांडीकुंडी.  भातुकलीच्या खेळातील संसारापेक्षाही छोटाशा संसार. शंकर गावच्या पाटलाच्या शेतावर दरसाल १५ हजार रुपयांवर सालगडी म्हणून कामाला. पारू गावातील इतर बायकांबरोबर शेतमजुरीला जाऊन घराला थोडाफार हातभार लावत होती. नऊ-दहा वर्ष उपवास- तापास नवस केल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर कृष्णा हे नाजूक उमलेले फुल.

त्या दोघांच्या निरस संसारात कृष्णाच्या रूपाने नवचैतन्य फुलले. श्रीमंतांच्या मुलांसारखे ते कृष्णाचे हट्ट पुरवू शकत नव्हते पण जे जमले तेवढे ते देण्याचा प्रयत्न मात्र करत होते. कृष्णाला खूप शिकवायचे जीवाचे रान करून त्याला शिक्षण द्याचे. आपल्या वाट्याला जे जीवन आले ते कृष्णाच्या वाट्याला येऊ द्याचे नाही. शिक्षण हाच एक पर्याय आहे या गरिबीत माखलेल्या संसारातून उभारी घेण्याचा. असे खूप खूप स्वप्न शंकर उराशी बाळगून कृष्णाचे लाड पुरवत होता.

पावसाळ्याचे दिवस होते. शंकरला शेतावर काम मिळत नव्हते. घरात खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. पारूला आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ती कृष्णाला घेऊन शेतमजुरीला येत होती. ऊसाच्या शेतामध्ये बांधाच्याकडेला साडीची झोळ करून कृष्णाला झोपवून ती कामावर जात होती. कधी-कधी कृष्णाची भूखेने झोपमोड होई. तो झोळीतच टाहो फोडत राही पण पारू मात्र मालकाच्या भीतीने खाली मान घालून काम करत. गरिबाला आपल्या भावना अश्याच मनात धगधगत ठेवाव्या लागतात . 

एक दिवस संध्याकाळी आकाशात काळ्या ढगांची गर्दी वाढू लागली. पारूच्या मनाला काळजीने वेढले होते. आकाशात ढगांचा गडगडाट , वीजेचा थैमान सुरु झाले. सुसाट्याचा वारा सुटला होता. सरी मागून सरी कोसळू लागल्या जणू आभाळाला भलेमोठे भगदाड पडले आहे. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे कुठे झाडाखाली निवारा घेणे पण सोयीचे नव्हते. पारू कृष्णाला पदराखाली घेऊन घराकडे झप झप चालली होती. घरी पोहोचताच पारुने कृष्णाला अंथरुणावर झोपवले. इवलेसे ते नाजूक गोंडस बाळ थंडीने थड-थड उडत होते. तिने त्याचे ओले कपडे बदलले, चूल पेटवून निखारा पाडला तो तव्यावर घेऊन कृष्णाला ऊब देऊ लागली. त्याला उचलून आपल्या छातीला लावले पण तरी कृष्णा तोंड उघडत नव्हता. कृष्णाची ही अवस्था पाहून शंकर गांगरून गेला होता. त्याने रागाच्या भरात पारूच्या कंबरठ्यामध्ये दोन लाथा मारून तिला शिव्या हासडू लागला. "भवाने आग लावायची हुतीस न त्या मालकाच्या कामाला , माझ्या किसनाला काय झाले तर? "    

पारू रात्रभर कृष्णाला मांडीवर घेऊन जागरण करत राहिली.  कृष्णाच्या अंगात ताप चढत होता. सकाळी उठल्या उठल्या शंकर पाटलाच्या वाड्यावर पैसे मागण्यास गेला. पण बायकोच्या बाळंतपणाला तर घेऊन गेलास कि रे भाड्या. हे वाक्य ऐकून घराकडे परतला. बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र त्यामधील चार सोन्याचे मणी सावकाराकडे गहाण ठेऊन तीन हजार रुपयांची सोय केली. ते कृष्णाला घेऊन तालुक्याच्या गावाला आले. हॉस्पिटलमध्ये कृष्णाला जनरल वार्ड मध्ये अडमिट केले. डॉक्टरांनी तपासणी सुरु केली तेवढ्यात एक नर्स घाईत येऊन तिने डॉक्टरांच्या कानात काही कुजबुज केली. डॉक्टर घाई घाई ने निघून गेली. नर्स ने डॉक्टर ने दिलेले इंजेक्शन कृष्णा ला दिले आणि ती देखील डॉक्टर पाठोपाट निघून गेली.

आमदाराच्या मुलाच्या गाडीला अपघात झाला होता. मुलगा पूर्ण दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत असताना हा अपघात झाला होता. सर्व डॉक्टर्स त्या कामात गुंतलेले होते. इकडे शंकर आणि पारुचा जीव वर खाली होत होता. कृष्णाचा ताप काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नव्हता. तीन-चार तास वाट पाहून देखील कोण येत नाही हे पाहून शंकर चौकशी करायला गेला. तिथे त्याने एका शिकवू डॉक्टरला बोलून आणले पण तोपर्यंत या कोवळ्या जीवाची जीवन ज्योत कधीच मावळली होती. दवाखान्यात ६०० रुपये बिल भरून ते दोघे तो नाजून देह घेऊन हताश बाहेर पडले. पारूच्या दुखाला अंत नव्हता. पण समजुतीचे दोन शब्द सांगणारे कोणी जवळ नव्हते. जगण्याची जी एक आशा तीच आता राहिली नव्हती. त्यांच्या अंधारमय जीवनात अनामिक पेटलेली ज्योत गरिबीच्या झुळुकेने विझून गेली होती. आता उरला होता फक्त अंधार.

 कृष्णाच्या मरणाला जबाबदार कोण नियंती का त्याच्या घरची गरिबी? आज आपण बोलतो हे प्रगतीचे युग आहे. झपाट्याने शहरे वाढत चालली आहेत पण खेडे अजूनही हि तशीच परावलंबी. मोठे मोठे हॉस्पिटल कॉलेज हे फक्त शहरांच्याच जवळ बनतात. अजून शेतकऱ्याला शेतीला पाणी द्याला ८ तासापेक्षा जास्त वीज मिळत नाही. ही खेडे स्वयंपूर्ण कधी होणार? गरिबी ही अशीच शाप म्हणून राहणार का? सरकार चालते ते फक्त उच्च मध्यमवर्गीयांसाठी आणि श्रीमंतासाठी पण गरीब कष्टकरी सामान्य कामगाराकडे कोण लक्ष देते. त्याच्या खूप काही मागण्या नाहीत फक्त अन्न ,निवारा आणि आरोग्य एवढ्याश्या मागण्या आहेत. प्राथमिक गरजांसाठीच त्याची धावपळ सुरु असते. 
 

-विजय

Sunday, May 26, 2013

Facebook (एक कटू सत्य )



घरातील वातावरण खूप आनंदी होते. विजयचा इंजिनियरिंगच्या व्दितीय वर्षाचा आज निकाल होता.तो अपेक्षेप्रमाणे चांगल्या मार्क्सने पास झाला होता. आई घरात स्वयंपाकाच्या कामात गुंतलेली होती. बाबा अजून रानातून आले नव्हते. विजय त्यांची खूप वाट पाहत होता त्याला बाबांना निकाल कधी सांगेन असे झाले होते. घरातील आम्हा दोन भावात तो लहान आहे  त्यामुळे थोडा लाडात वाढलेला आहे. माझ्या पेक्षा वयाने लहान जरी असला तरी वैचारिक वादामध्ये तो नेहमीच मला वरचढ होता. तो नेहमीच्या सवयीप्रमाणे कोणतेतरी मोठे पुस्तक घेऊन वाचत बसला होता. मी त्याच्या कडे एकटक पाहत होतो. त्याच्या कडे पाहत असताना वर्षापूर्वीचा तो दिवस माझ्या डोळ्या समोर नाचत होता. त्या दिवस घडलेला प्रसंग चित्रपटाच्या कहाणी सारखा डोळ्यासमोरून जात होता.

सूर्या हॉस्पिटलच्या ऑपेरेशन थेअटर बाहेर बाकावर खाली मान  घालून बसलो  होतो.ऑपेरेशन थेअटरच्या दारावर जळणारा लाल दिवा धोक्याची घंटा वाजवत होता. मनात असंख्य विचार घोळत होते. विजय असे काही करेन असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. लहानपणापासून अभ्यासात हुशार स्मित भाषी विजय असा काही करेन. दहावी ला ८४%  मार्क्स मिळवणारा गावातील इतिहासातील एकमेव मुलगा. बाबांना किती आनंद झाला होता. घरातील आर्थिक परिथिती नसताना ही त्याला बारामतीला तालुक्याच्या गावात नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अजून ही कळत नाही विजय ला तिथे गेल्या काय झाले. आज त्याचा बारावीचा निकाल आणि तो हॉस्पिटल मध्ये. इतका हुशार मुलगा सायन्स च्या ग्रुपच्या सगळ्या विषयात नापास होतो आणि आपला निकाल पाहण्या आधीच त्याची कल्पना येऊन असे मृत्यूला जवळ  करावे माझ्या कल्पने पलीकडले होत  हे सगळे. कोणत्या  वाईट  गोष्टीमध्ये तो अडकला असेन? प्रेमाची तर काही भानगड नसेन ना?
आयुष्यवर इतके प्रेम करणारा कोणी व्यक्ती असे मरणाला जवळ करेन का? थोर व्यक्तींना पण आयुष्याच्या एका टप्प्यावर मृत्यूबद्दल वाटणारी ओढ वाढत जाते. विजय तू खूप पुस्तके वाचली असतील पण तू आचरणात काहीच नाही आणले. तसे असते तर किती हि मोठी चूक असू दे तू त्याला तोंड दिले असते. तू भ्याड निघालास. कोठे गेले तुझे ते तत्त्वज्ञान? का ते फक्त तोंड मध्ये आणि मनातून असाच सामान्य माणसासारखा. जगात असे कोणतेच अपयश नाही जे माणूस पचवू शकत नाही, पण त्या अपयशाला जग हसेन म्हणून तर माणुस आत्महत्या करतो.
मला त्याचा खूप राग आला होता पण त्याच्या कृतीमागचा हेतू स्पष्ट होत नव्हता. तेवढ्यात खाकी ड्रेस मध्ये एक हवालदार माझी चौकशी करत येत होता. "तुम्ही सुरेश कोळेकर का?" "तुमच्या भावाचे हे पत्र त्याच्या रूम वर मिळाले."
मी ते पत्र हातात घेऊन वाचू लागलो-
' तात्या मी चुकलो. तुझ्या मनात खूप प्रश्न  घोळत असतील. मला खात्री आहे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. आपल्या दोघाचे मित्रासारखे नाते आहे तू मला समजून घेशील इतका विश्वास म्हणून तुला लिहत आहे. मी तुमचा खूप दोषी आहे. तुमच्या अपेक्षांवर मी पाणी सोडले. बाबांनी मोठ्या आशेने मला बारामतीला प्रवेश घेऊन दिला होता. ११ वीचे वर्ष खुप छान गेले. १२ वी ला सुरुवात चांगली झाली होती. सुरुवातीपासूनच अभ्यास करायचा असे ठरवले होते. आयुष्यात जे ठरवले तेच होऊ लागले तर त्याला आयुष्य तरी कसे बोलायचे? १२ वीचे वर्ष महत्त्वाचे म्हणून टक्केवारी छान मिळावी म्हणून मी मराठी विषय ऐवजी माहिती तंत्रज्ञान हा विषय निवडला. मला काय माहित होते हा विषयच पुढे जाऊन माझ्या आयुष्याची वाट लावणार आहे ते.  सप्टेंबर महिन्यापासून  माहिती तंत्रज्ञान विषयाचे प्रात्याक्षिके  सुरु झाले. तासाच्या त्या काळात कोणते हे शिक्षक नसायचे. कॉलेज ने प्रत्येक संगणकाला इंटरनेटची सुविधा पुरवली होती. त्याकाळात फेसबुक  ची खूप चर्चा सुरु होती. मी पण माझे खाते सुरु केले. रोज नवीन नवीन मित्रमैत्रिणी जोडत गेलो. खूप वेळ त्यांच्याशी गप्पा मारण्यात जात होता. एक दिवस एक फ्रेंड रेक्वेस्ट आली होती. मुलीचा फोटो खूप सुंदर आणि आकर्षक होता. रोज तिच्याशी गप्पा मारू लागलो. कॉलेज मध्ये झाले कि बाहेर जाऊन नेट कॅफेमध्ये बसू लागलो. घरून आलेले पैसे त्यावर उडवू लागलो. काही दिवस तर तहान भूख विसरून मी पूर्ण दिवस नेट कॅफेमध्ये घालवले . मला जणू व्यसनजडले होते. कॉलेजचे तास बुडवू लागलो होतो. अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हते. आमच्या गप्पा आता खूप खाजगी विषयात जाऊ लागल्या होत्या. अश्लिल गोष्टी मध्ये गुंतत गेलो. एक दिवस असेच कॉलेजला  गेलो होतो क्लासमध्ये प्रवेश करताच सगळे मुले हसू लागले मला कळत नव्हते. मग नंतर मी त्या मुलीशी ज्या खाजगी गप्पा केल्या होत्या त्या वरून मला टोमणे मारू लागले. हळू हळू हे सर्व कॉलेजमध्ये पसरले. एका माझ्याच क्लासमधील मुलाने त्या मुलीच्या नावाने बनावट खाते सुरु केले होते. मला खूप अपराधीपणा  वाटू लागला. कॉलेज ला जाणे बंद केले रूम मध्येच पडून राहू लागलो. मनामध्ये न्यूनगंड वाढत गेला. घरी तरी कोणत्या तोंडाने  सांगावे काही कळत नव्हते. अशाच परिस्थितीत कसे तरी पेपर दिले. पण अभ्यास काही नव्हताच तर काय होणार हे माहित होते. मी खूप मोठा अपराध केला आहे. मला जगण्याचा काही अधिकार नाही. मी आई बाबा तुमच्या सर्वांचा गुन्हेगार आहे. मी तुम्हाला तोंड दाखवण्याचा लायक नाही राहिलो. आईची काळजी घे. जमले तर माफ कर माहित हे ते खूप कठीण आहे.’   

पत्र वाचून विजयवरचा राग कमी झाला नव्हता पण थोडी सहानभूती जरूर वाटत होती. त्याने जे कृत्य केले त्याला तो जरी जबाबदार असला तरी त्याची मज्जाक ज्या मुलांनी केली ते पण तितकेच जबाबदार होते. इतक्यात डॉक्टर बाहेर आले "अभिनंदन  तुमचा भाऊ वाचला . "

विजयचे नशीब चांगले होते म्हणून देवाने त्याला दुसरी संधी दिली होती. पण आज ह्या समाजात विजय सारखे खूप किशोरवयीन मुले आहेत जे ह्या मोहात अडकून पडले आहेत. प्रत्येकालाच देव सुधारण्याची दुसरी संधी देईल असे तर नाही ना. आजची ही नवीन पिढी खूप  भयाण वाटने चालली आहे. आई-बाबा हे पैसा कमवण्याचा मागे इतके लागले आहेत कि त्यांना वेळच मिळत नाही आपले पाल्य काय करतात हे पाहण्यासाठी . त्या वयामध्ये मुलांना फक्त मारून काही होत नाही. खरे तर त्या वयात मुलांना गरज असते ते एका मित्राची. जो  त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचा इतका लहान होऊन त्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगेन. शाळेत जाणाऱ्या मुलांकडे काही गरज नसतात मोबाईल फोन का देतात? हो कळत आहे जे जग खूप प्रगती करत आहे रोज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे मुलांना त्याची माहित व्हावी पण त्यासाठी पण काही वय असते. शिक्षण ह्या संकल्पनेचा पण आता अर्थच बदलेला आहे. शिक्षण फक्त नौकरी मिळवण्याचे माध्यम राहिले आहे. कुणाला इथे आदर्श नागरिक व्हायचे नाही. शालेय आभ्यासक्रमामध्ये नागारिकशात्र हा विषय असतो फक्त  २०  मार्क्ससाठी आणि तो पण इतिहास ह्या विषयाला जोडून. तो विषय पर्याय ठेऊन देखील ६० मार्क्स मिळतात तर मग मुले तरी कसला हा विषय गोडीने शिकतील?

विजय ह्या धक्यातून सावरला आई-बाबांनी मुखत्वे बाबांनी विजय ला मित्राप्रमाणे समजून सांगितले. पुन्हा परीक्षा देऊन ८१% मार्क्स ने पास झाला. ग्रुपला ९४% मार्क्स मिळाले. तो आता एका नामवंत कॉलेजमधून अभियांत्रिकी चा अभ्यास करत आहे. खरच  आज भरकटलेल्या किशोरवयीन मुलांना गरज आहे तत्वनिष्ट, आदर्शवादी शिक्षणाची. त्यांना गरज आहे एका जवळच्या मित्राची योग्य मार्ग दाखवणाऱ्या. वासना ही ह्या वयात एका विस्तवाप्रमाणे मनात जळत असते त्याला थोडी जरी फुंकर मिळाली तर त्याचा वणवा पेटायला वेळ लागत नाही. त्या वणव्यात त्याच्या आयुष्याची क्षणात राख होऊ शकते.  


-विजय