मला निसर्ग फार आवडतो कारण तिला तो खूप आवडायचा. ती नेहमी म्हणायची प्रेम
असावे तर या निसर्गासारखे चिरंजीव, निरागस आणि निस्वार्थ. माणसाने किती ही
हस्तक्षेप केला कितीही त्रास दिला तरी हा निसर्ग प्रेम करतच असतो. कधी कधी
माझ्यासारख्या हट्टी प्रियसी सारखा रुसून ही बसतो मग सगळीकडे दुष्काळ पडतो
आणि आपल्या प्रियकराच्या डोळ्यांतून मात्र बरसत राहतो. नवरा बायको मध्ये
कडाक्याचे भांडण व्हावीत आणि बायकोने सोडून माहेरी जाण्याची धमकी द्यावी
तसा हा निसर्ग पण कधी कधी आपले रुद्र रूप दाखवतो मग येतो तो भूकंप किंवा
सुनामी. जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा खरे तर आकाश रडत असते दुखात आपल्या
सख्याची या ढगांची काही क्षणाची साथ आता सुटणार म्हणून. मला तिचे हे
प्रेमाचे गणित कधी कळतच नसे. मी फक्त तिच्या टपोर डोळ्यात माझेच प्रतिबिंब
पाहत असे.
नदीकिनारी बसून पाण्यात दगड मारण्याची तर तिला फार हौस. पाण्यात दगड
मारल्याने पाण्यावर उठणारे ते तरंग पाहण्यात ती अगदी गुंग होऊन जाई. ते
पाण्यावर उठणारे तरंग किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत नाहीसे होत जात, मग
मात्र ती उदास होत असे. मला अगदी बिलगून बसे आणि विचारी "विजय तू पण मला
सोडून असाच नाहीशा होणार का रे ? आपले प्रेम किनाऱ्यापर्यंत पोहोचणारच नाही
का ? देव अश्या जोड्याच का बनवतो त्या कधीच न जुळणाऱ्या?" मी मात्र तिची खोटी समजूत काढत असे "मी पाण्यावरचा तरंग नाही नाहीशा होणारा. मी तुझा शरीराने नाही झालो तरी मनाने तुझाच ग असेन सखे."
अजूनही मी या नदीशी
बोलत राहतो. तीच एक उरली आहे आमच्या प्रेमाची साक्षीदार.
तुझ्या किनारी कितीदा
तिला मी भेटायचो
तिच्या मिठीत सर्वस्व
मी हरवून जायचो
कोमल तिच्या स्पर्शाने
अंग माझे फुलायचे
तिच्या माझ्या चुंबनाने
तुझ्यातील मासे किती लाजायचे
अशा किती गोड आठवणीची
साक्ष तू व्हायची
आज मात्र आलो मी एकटाच
तुझ्यात मिसळून जायला
दुरवर तिच्यापासून
सांगत होतीस तू मला
पोरगी म्हणजे माझ्यावरून
वाहणारी शीतल हवा
देऊन जाते क्षणभर गारवा
शेवटी उरते फक्त जाणिव तिची
पावसाळ्यात हिरवळी ने नटलेले डोंगर त्यावरून वाहणारी शीतल हवा तिला फारच
मोहिनी घालत. दर पावसाळ्यात ती मला हट्ट करी गावाच्या वेशीवरील टेकडी वर
जाण्याचा. त्या टेकडीवर वाहणारी शीतल हवा तिला माझ्या जवळ खेचत होती.
माझ्या मिठ्ठीत ती सुखावून जात असे. पावसाळ्याच्या एक दिवशी अशीच माझ्या मिठ्ठीत डोळे मिटून स्वप्न पाहत होती. स्वप्नात ती समुद्रकिनारी मावळतीचा सुर्य पाहत होती. क्षितिजावर तो लाल गोळा पाण्याला चिकटला होता. आकाशात केशरी रंगाची उधळण सुरु होती. तो
मनमोहक नजराणा ती आपल्या डोळ्यात साठवून घेत होती. सुर्य अर्धा
पाण्यामध्ये बुडाला होता इतक्यात तिच्या समोर मी येतो. तिला तो सूर्यास्त
पहायचा असतो पण तिच्या आड मी येत होतो. तिचा राग अनावर होत होता. ती अशी
रागावते तेव्हा अधिकच सुंदर दिसते म्हणून मी पण तिच्या समोरून दूर होत
नव्हतो. तिला आता माझ्यापेक्षा तो सुर्यास्तच जास्त प्रिय होता. तिने मला
दूर ढकलले आणि इतक्यात एक भयाण लाट येऊन मला घेऊन जाते. ती दचकुन विजय नको
जाऊस ना मला सोडून म्हणून अजून घट्ट मिठ्ठी मारते. ती स्वप्नातून बाहेर पडून माझ्या डोळ्यात एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी तिला जवळ घेतले आणि विचारले काय झाले सोन्या? ती बोलली स्वप्नात तू मेलास. मी बोललो "आपण कधीच मरणार नाही, आपल्याकडे अमृत आहे." तिने मानेनेच विचारले "कोठे?" मी तिचे उत्तर माझ्या ओठांनी तिच्या ओठांवर दिले.
आज ती माझ्या सोबत नाही पण तिच्या आठवणी अजून हे मनात ताज्या आहेत. दिवसभर
कामात स्वतःला गुंतवून ठेवतो पण सूर्य मावळतीला लागला कि, जशी आकाशात
चादण्यांची गर्दी होते तशी मनात तिच्या आठवणी दाटून येतात. तिला देखील
माझ्या आठवणी छळत असतील. आम्ही जवळ आलो होतो ते दूर जाण्यासाठीच. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टी मध्ये फक्त ती दिसते.
ती मला भेटली होती काही काळासाठी फक्त, हे दोघांना माहित असताना ही खूप
प्रेम केले आम्ही एकमेकांवर. आज ती दुसऱ्याची आहे शरीराने पण अजून ही
मनामध्ये मीच आहे. हा समाज मुलींना एकटे जगू देत नाही, नाहीतर ती सुद्धा
माझ्यासारखी अशीच एकटी माझ्या आठवणीमध्ये जगली असती. अजूनही
कधी भेटली तर एकच सांगते तू पण लग्न कर. लग्न म्हणजे मला तर जुगारच वाटतो
त्या पेक्षा चांगल्या कामात आयुष्य घालवलेले बरे नाही का?
आज मनाला किती खिन्न वाटते
आठवणीचे मोहाळे मनातून उडू पाहते
भावनांच्या नद्या डोळ्यातून वाहू लागते
असंख्य ताऱ्यातून प्रेमाचाच तारा निखळू लागतो
जसा सुगंध जातो सोडून फुलातून
तशी तू मला सोडून जाते
आज मनाला किती खिन्न वाटते