Saturday, December 19, 2015

ती वेश्या नाही देवाला सोडलेली मुरळी आहे

दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्यादिवाळी आली अन गेली पण आता घरी बसण्यात खूप कंटाळवाणे वाटत होतेएक दिवस संध्याकाळी घरामध्ये काहीच मन लागत नव्हते. थोडासा विरुंगुळा म्हणून गावात गेलो होतो. गावात शिवाजी चौकात शिवाजी पुतळ्या शेजारील कट्ट्यावर  गावातील तरुणवर्ग तसेच शाळा महाविद्यालायातील पोर आपआपला घोळका करून इकडच्या तिकडच्या गोष्टीवर चर्चा करत वेळ घालवत असतात. त्या संध्याकाळी मी देखील माझ्या जुन्या मित्रांसोबत त्या कट्ट्यावर जुन्या शाळेतील आठवाणी मध्ये गप्पा मारत रमलो होतो. आमच्या बाजूला नुकतीच महाविद्यालयात जायला लागलेला नवतरुण मुलांचा घोळका त्यांच्या नेहमीच्या गप्पा मारत होता. त्याचा विषय म्हणजे मुली आणि त्यांची लफ़डे. ह्या असा सगळ्या वातावरणात वेळ जात होता हेच माझ्यासाठी महत्वाचे होते.

जुन्या आठवणी म्हटल्यावर त्यात एक ती असतेच जिच्या सौंदर्याची आपल्याला त्या वयात भुरळ पडलेली असते. मी ही त्याक्षणी मनातून तिच्या आठवणीमध्ये रमलो होतो. शाळा संपून अकरा एक वर्ष होत आले पण अजूनही  ती जशीच्या तशी डोळ्यासमोर दिसत होती. तिचे ते घारे निळसर डोळे गालावर पडणारी ती नाजूक खळी सगळे कसे वेड लावणारे होते. मी तिच्या आठवणीमध्ये इतका मग्न झालो कि आजूबाजूची सगळी दुनियाच विसरून गेलो.

मी भानावर आलो ते एका आवाजाने, बाजूला असलेल्या नवतरुण मुलांच्या घोळक्यातील मुलाचा तो आवाज होता. त्याने समोरून जाणाऱ्या एका पोटोशी असलेल्या सुंदर मुलीला उद्देशून बोलल्याचा आवाज होता. तो त्या मुलीला पाहून मोठ्याने बोलला "काय गणपती बसला वाटतो ? आता विसर्जन कधी? ".
मी समोर पाहिले तर काय योगायोग मी आता ज्या मुलीच्या आठवणी मध्ये रमलो होतो ती मुलगी ती हीच होती. दोन मिनिट माझा मलाच विश्वास होत नव्हता. अन वाईट पण खूप वाटत होते. तो मुलगा असा का बोलला असेल? ती पण खाली मान घालून का गेली? का तिने त्या मुलाला रागात पाहिले नाही? का सहन केले ? का ती इतकी असह्य होती?
मी माझ्या मित्राला विचारले, आरे तो मुलगा असा का बोलला ? त्याला नक्की काय बोलायचे होते? माझ्या साठी हे सगळे नवीन होते.
मित्र बोलला, "विज्या गणपती बसला म्हणजे ती आता गरोदर आहे अन विसर्जन म्हणजे ती ते खाली करेल ".
मी : "का ती का खाली करेल "?
मित्र : "तिला नवरा नाही "
मी:  "काय! काय झाल तिच्या नवऱ्याला?"
मित्र : "तिला नवराच नाही".
मी : "मग ही गरोदर कशी ?"
मित्र : "आरे ती कुणाला पण देते पैशावर ".
मी : "काय ? म्हणजे वेश्या आहे काय?"
मित्र : "तू वेडा आहेस का जरा, असले फालतू धंदे आपल्या गावात नाही चालत "
मी : "मग ?"
मित्र: "ती वेश्या नाही देवाला सोडलेली मुरळी  आहे"

हे सगळे ऐकून डोक्यात झिणझिण्या आल्या. इकडे देवळात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून रोज नवीन नवीन आंदोलन ऐकायला मिळतात. ह्याच महाराष्ट्रामध्ये स्त्रीशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्याच महाराष्ट्रामध्ये अजून स्त्रियांवर देवाच्या नावाखाली अत्याचार होत आहेत. कशाला हवा मंदिर प्रवेशकोणता देव न्याय देणार आहेसमाज ह्यांना देवदासी म्हणतो पण माणसाच्या मनातील वासनारूपी राक्षस ह्या देवदासींना  जिवंतपणीच  नरक यातना देत आहे. हे कोठे तरी थांबले पाहिजे. माणसातील देव ओळखता आला पाहिजे

पसरून पदर देवा
मागते मी मागण
जीण हक्काच रे माझं

केला नवस बापान
होऊ दे पोर म्हणून,
अन सोडली मला
देवाची मुरळी म्हणून

वय होते खेळायचे
खेळ भातुकलीचा,
मांडावा लागला खेळ
हा वाघ्या-मुरळीचा

अशा कसा रे न्याय तुझा
देवदासी म्हणतो  आम्हास,
तरी घालतो हात आमच्या पदरास
हा निष्ठुर माणूस

लग्न-गोंधळात दुसऱ्यांच्या
नाचतो आम्ही मुरळी,
पण आम्ही नाही पाहायचे
स्वप्न आमच्या लग्नाचे

असा कसा रे न्याय तुझा
वेगळा आम्हासाठी,
पसरून पदर देवा
मागते ते मी मागण
जीण हक्काच रे माझं

******************विजय*******************